” भाजपा सत्ता मिळाल्यास शिरूरचा सर्वांगीण विकास निश्चित – जयश्री पलांडे”

शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपालिकेची सत्ता भाजपाकडे मिळाल्यास शहरातील प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने लक्ष दिले जाईल आणि सर्वांगीण विकासाची नवी पर्वणी सुरू होईल, असा ठाम विश्वास पुणे जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा तथा भाजप नेत्या जयश्री पलांडे यांनी व्यक्त केला. शिरूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रचार फेरीदरम्यान त्या कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधत बोलत होत्या.
पलांडे म्हणाल्या की, “केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला प्राधान्य देणारे सरकार आहे. शिरूरमध्येही भाजपाची सत्ता आल्यास शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी खेचून आणण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, उद्याने, सार्वजनिक सुविधा यांसारख्या मूलभूत गरजांवर ठोस कामे करून शिरूरला ‘फडणवीस मॉडेल’नुसार आधुनिक रूप दिले जाईल.”

या प्रचार फेरीदरम्यान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा राजेंद्र लोळगे, नगरसेवक पदाचे उमेदवार करण खांडरे, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया बिरादार, उपाध्यक्षा सुष्टी करंजुले, निलू शर्मा, ॲड. आदित्य लोळगे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना जयश्री पलांडे म्हणाल्या,
“शिरूर शहराचा सर्वांगीण विकास हा आमच्या अजेंड्याचा केंद्रबिंदू आहे. लोकांनी भाजपाच्या उमेदवारांना संधी दिल्यास शहराच्या प्रत्येक भागात दर्जेदार सुविधा उभ्या करण्यात येतील. नागरिकांनी यावेळी विकासाला मत देऊन भाजपा नगराध्यक्ष उमेदवार सुवर्णा लोळगे व सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करावे.”

मुख्य संपादक : अर्जुन बढे
