खासदार अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शिरूरमध्ये महाविकास आघाडीची शक्तीप्रदर्शन रॅली

शिरूर प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आणि शिरूर शहर महाविकास आघाडीच्या वतीने आज शिरूर शहरात भव्य आणि शक्तीप्रदर्शन करणारी रॅली काढण्यात आली. शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे रॅलीत विशेष उत्साह पाहायला मिळाला. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिरूर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार अलका सुरेश खांडरे तसेच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही रॅली आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर रॅली शहराच्या मुख्य रस्त्यांवरून निघाली.
या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, माजी नगराध्यक्ष गुलाब धाडीवाल, माजी नगरसेवक संतोष भंडारी, अबिद शेख यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीदरम्यान नागरिकांना नगराध्यक्षा पदासाठी अलका खांडरे यांना, तसेच सर्व आघाडीच्या उमेदवारांना प्रामाणिकपणे मतदान करून विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
शिरूर-हवेलीचे माजी आमदारांनी केलेली विविध विकासकामे, सुरू असलेल्या योजना आणि आगामी प्रकल्पांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली.
शहरातील मुख्य बाजारपेठ, पेठ क्षेत्र, प्रमुख मार्ग आणि विविध वस्ती भागांतून रॅलीचा भव्य विस्तार झाला. ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि रंगतदार वातावरणामुळे संपूर्ण शहरात निवडणूक उत्साह पसरला होता.

मुख्य संपादक : अर्जुन बढे
