राजकीय

“शिरूरला नवे रूप देण्याची वेळ आली; विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध – अजितदादा”


शिरूर प्रतिनिधी :

शिरूर नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभेला पाचकंदील चौकात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिरूर शहराच्या वाढत्या गरजा, पायाभूत सुविधांचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन, हद्दवाढ, शिक्षण व उद्योगसाखळीचा विकास अशा सर्वच मुद्यांवर अजितदादांनी थेट, स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत शिरूरच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला.

सभा सुरू होताच अजितदादांनी शिरूरच्या जलद वाढणाऱ्या शहरीकरणाचा वेग अधोरेखित केला. कारेगाव, कर्डे, रांजणगाव आणि सुपा या औद्योगिक वसाहती झपाट्याने वाढत असल्याने शिरूर शहर हे पुढील काही वर्षांत मोठे शहरी केंद्र बनेल, असे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या लोकसंख्येनुसार शहराचा विकास नियोजनबद्ध करण्याची गरज तातडीची असल्याचे ते म्हणाले. शिरूर शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी जी काही मदत लागेल ती करण्याची तयारी त्यांनी जाहीर केली तसेच प्रलंबित असलेल्या क्रीडा संकुलाच्या प्रश्नाला लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. शहराच्या हद्दवाढीचा प्रश्नही सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन निकाली काढण्यात येईल, असे ते म्हणाले.

कायद्याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेत अजितदादांनी इशारा दिला की, “कायदा हातात घेऊन डिंगडॉंग करणाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. तो माझ्या जवळचा असो वा लांबचा, कायद्यासमोर कोणीही मोठा नाही. दहशत कधीही सहन केली जाणार नाही.”
शहराची बाजारपेठ, वाहतूक व्यवस्था, शैक्षणिक पातळी आणि शिस्तबद्ध वाढ यावरही त्यांनी भर दिला.

शिरूर शहरासाठी गेल्या अडीच वर्षात सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीबाबत बोलताना पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, शहरासाठी आतापर्यंत जवळपास ऐंशी कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. ७१ कोटी रुपयांची मोठी पाणीपुरवठा योजना, प्राथमिक शाळा इमारतीसाठी तीन कोटींचा निधी आणि इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. “विद्यमान खासदाराने शिरूर शहरासाठी नेमका किती निधी आणला?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.

आमदार माऊली कटके यांनी शिरूर शहराला पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य शहर बनविण्याचा ध्यास घेतल्याचे सांगितले. शहरातील भुयारी गटार योजना आणि पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने निधी दिला असून शिरूर शहराची हद्दवाढही मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रथमच शिरूर नगरपरिषद निवडणूक पक्षावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कटके यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक, सुशिक्षित आणि विकासाभिमुख पॅनल उभे करण्यात आले असल्याचे अजितदादांनी सांगितले. काही जण चुकीचा प्रचार करत आहेत की त्यांनी अधिक जागा मागितल्या, परंतु प्रकाश धारीवाल यांनी स्वतःच निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय आपल्याला सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादीने स्वतःचे उमेदवार उभे केले असून या पॅनलला शिरूरकरांनी मोठ्या ताकदीने पाठिंबा द्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

सभेत माजी नगरसेवक विनोद भालेराव, निलेश लटांबळे, निलेश गाडेकर, अविनाश घोगरे, विठ्ठल पवार आणि अभिजीत पाचर्णे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर जोरदार बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी शिरूर शहराला नवे स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “रसिकभाऊ आणि प्रकाश धारीवाल यांनी शिरूरच्या विकासाला वेगळे रूप दिले. स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांनीही मोठे योगदान दिले आहे. आता अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार माऊली आबांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला नवीन दिशा देणार आहोत. सामान्य शिरूरकर माझ्या पाठीशी उभे राहतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

या सभेला माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, संचालक सुधीर फराटे, राहुल जगताप, शशिकांत दसगुडे, विठ्ठलराव ढेरंगे, श्रीनिवास घाडगे, महेश ढमढेरे, शरद कालेवार, आरती भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी आभार मानले.


वेध बातमीचा

मुख्य संपादक : अर्जुन बढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *