तहसील कार्यालय परिसरातील वाळू व अवैध वाहने हटवण्याची मागणी; भाजप महिला आघाडीचे निवेदन
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारातील साचलेली वाळू, अवैध तसेच बंद अवस्थेतील जड वाहने तात्काळ हटवून परिसर स्वच्छ व मोकळा करण्यात यावा, अशी मागणी भाजप महिला आघाडी, शिरूर शहर यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रियाताई लोकेश बिरादार यांनी तहसीलदार श्री. बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षी ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्यदिन व जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण व विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांच्या वेळी नागरिकांना बसण्यासाठी व कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी स्वच्छ व मोकळ्या जागेची नितांत गरज असते. मात्र सध्या आवारात उभ्या असलेल्या वाहनांमुळे व अस्वच्छतेमुळे पुरेशी जागा उपलब्ध होत नसून नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
तसेच तहसील कार्यालयात दररोज शिरूर तालुक्यातील अनेक नागरिक विविध शासकीय कामकाजासाठी येत असतात. मात्र वाहन पार्किंगसाठी योग्य व्यवस्थेचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तहसील आवारात मोठ्या प्रमाणावर वाळू साचलेली असून काही अवैध तसेच बंद अवस्थेतील जेसीबी व इतर जड वाहने अनेक दिवसांपासून तिथेच उभी असल्याने परिसर अस्वच्छ दिसत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या आवारातील वाळू तात्काळ हटवून अवैध व बंद पडलेली वाहने काढून परिसर स्वच्छ व मोकळा करण्यात यावा, अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत तहसील प्रशासन सकारात्मक कार्यवाही करेल, अशी अपेक्षा भाजप महिला आघाडीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
यावेळी भाजप महिला आघाडीच्या शिरूर शहर उपाध्यक्षा सुष्ट्री करंजुले व निलमधु शर्मा उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : अर्जुन बढे

