शिरूर नगरपरिषद निवडणूक : रविवारी मतमोजणी, दोन तासांत चित्र स्पष्ट होणार

शिरूर प्रतिनिधी :
शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी होणार असून सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप यांनी नगरपरिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रीतम पाटील आणि प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ उपस्थित होते.
अभिजीत जगताप यांनी सांगितले की, शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार, दि. २ डिसेंबर २०२५ रोजी एकूण ३६ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानाची मतमोजणी शिरूर नगरपरिषद कार्यालयाच्या तळमजल्यावर रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.
मतमोजणीसाठी एकूण १२ प्रभागांनुसार १२ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्रत्येक टेबलावर एक याप्रमाणे एकूण १२ प्रतिनिधी ठेवण्याची मुभा देण्यात आली असून नगरसेवकपदाच्या उमेदवारांना प्रत्येकी एक प्रतिनिधी ठेवता येणार आहे.
काही प्रभागांची मतमोजणी दोन, काही तीन तर काही प्रभागांची चार फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार असून, संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया साधारण दोन तासांत पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मतमोजणी केंद्रात केवळ प्रवेश पास दिलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार असून सुरक्षेच्या दृष्टीने मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप यांनी स्पष्ट केले.

मुख्य संपादक : अर्जुन बढे
