राजकीय

प्रभाग ३ मध्ये सुनिल जाधवांचा वाढता प्रभाव


शिरूर प्रतिनिधी :

शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक जवळ येत असताना प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके व प्रभागातील लोकप्रिय नेतृत्व सुनिल जाधव यांच्या सक्रिय जनसंपर्क मोहिमेमुळे स्थानिक वातावरण राष्ट्रवादीच्या बाजूने झुकले असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

आमदार कटके यांनी शिरूर शहरातील सर्व १२ प्रभागांमध्ये तसेच प्रभाग ३ मधील विविध वसाहतींमध्ये भेट देत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. घराघरात भेट देत त्यांनी मतदारांच्या अडचणी, स्थानिक प्रश्न आणि अपेक्षा शांतपणे ऐकून घेतल्या. आगामी पाच वर्षांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शिरूर शहरात मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिषेक पाचर्णे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह कटके यांनी नागरिकांना राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, प्रभाग ३ मध्ये सुनिल जाधव हे प्रचाराचे प्रमुख चेहरे ठरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी व्यापक जनसंपर्क मोहीम उभारली आहे. सकाळपासून उशिरापर्यंत सुरू असलेल्या घरभेटी, स्ट्रीट मीटिंग्ज आणि संवाद सत्रांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिलांपासून युवकांपर्यंत सर्वच घटकांचा सहभाग वाढलेला असून राष्ट्रवादीच्या कामांवर आणि नियोजनावर त्यांचा विश्वास दृढ होत आहे.

  • रस्ते, पाणीपुरवठा, गटारव्यवस्था, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या विकासाबाबत पक्षाने केलेली कामे तसेच आगामी आराखडा नागरिकांना भावत असून विशेषतः तरुण मतदार रोजगार, शिक्षण आणि स्थानिक सुविधांवरील चर्चांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. कटके यांची समजूतदार भूमिका आणि जाधव यांचा लोकसंग्रह या दोन्हींचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीचा प्रचार अधिक जोम धरताना दिसतो आहे.

वेध बातमीचा

मुख्य संपादक : अर्जुन बढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *